मराठवाडा विकास सेना लढवणार मराठवाड्यातील आठही मतदारसंघात लोकसभा निवडणूक

Foto
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व प्रमुख पक्षात लोकसभा निवडणुकीबाबत खलबते सुरू असताना, नुकतीच उदयाला आलेली मराठवाडा विकास सेना आगामी काळात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकात मराठवाड्यातील आठही मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे संघटनेचे संस्थापक सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

आगामी काळात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकां करिता सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. यातच पूर्वी शिवसेना व नंतर मनसे मधून बाहेर पडून स्वतःचा मराठवाडा विकास सेना  स्थापनारे सुभाष पाटील यांनी देखील संघटना मराठवाड्यातील संपूर्ण आठ लोकसभा व ४८ विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.  यावेळी मराठवाडा विकास सेना कोणासोबत जाणार या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी योग्य वेळ आल्यावर आम्ही कोणासोबत जाणार व कोण आमच्या सोबत येणार हे दिसेलच असे म्हणून वेळ मारून नेली. काँग्रेस राष्ट्रवादी व सेना-भाजप हे चारही पक्ष आमचे प्रमुख शत्रू आहेत. मराठवाड्यातील आजच्या परिस्थितीला हेच जबाबदार असल्याचे सांगत तेथील विविध प्रश्नांवर सत्ताधारी व विरोधक गप्पच असल्याचे त्यांनी सांगितले.

घरवापसी नाहीच....
मराठवाडा हे आमचे कार्यक्षेत्र असून या बाहेर जाणार नसल्याचे पाटील म्हणाले. पूर्वाश्रमीच्या पक्षांकडून विचारणा करण्यात आली तर वापसी करणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कुठल्याही परिस्थितीत घरवापसी नाहीच असे स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांनी केली पाटलांची उमेदवारी जाहीर

संघटना मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघातून तयारी करत असताना औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असेल ? असे विचारताच पाटील यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु लगेच पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथून पाटील यांनी स्वतः लढावे अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे सांगितल्याने अप्रत्यक्षपणे त्यांची उमेदवारी यावेळी जाहीर झाली. 

असा मूर्ख खासदार बघितला नाही...
औरंगाबाद लोकसभेचा विषय येताच गेल्या दोन-तीन दशकांत असा मूर्ख खासदार बघितला नाही. अशा शब्दात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वर टीका करत, ज्याला काही कळतच नाही त्याच्याविषयी काय बोलायचे ! या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker